दरभंगा - मुख्यमंत्रीपदाची दावेदार आणि प्लुरल्स पार्टीच्या अध्यक्षा पुष्पम प्रिया यांनी आज तिसऱ्या टप्प्यात दरभंगामधील लहेरियासरायमध्ये मतदान केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. लालू प्रसाद यादव आणि नितिश कुमार यांच्यापासून बिहारमुक्त झाल्यानंतर राज्याचा विकास होईल, असे त्या म्हणाल्या. मला जनतेचे समर्थन मिळत असून माझा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिहारमध्ये पैसा आणि लोकांमध्ये भांडणे लावून निवडणूक होते. मात्र, यावेळेस रोजगार, शिक्षण आणि विकास ही मुद्दे आहेत. जाणूनबुजून राज्याचा विकास केला गेला नाही. मुलांना शिक्षण दिले नाही. त्यामुळे बिहारच्या भविष्यासाठी बदलाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान -
विधानसभेच्या 78 जागांसाठी आज (शनिवार) मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. हा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून निकाल लागेल. निवडणुकीच्या या टप्प्यात 1 हजार 204 उमेदवार रिंगणात आहेत. तर पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात 53.53% टक्के तर दुसऱया टप्प्यात 53.51 मतदानाची नोंद झाली.