नवी दिल्ली - तिहार तुरुंगात कैदेत असलेले निर्भया बलात्कार-हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपी सध्या तणावाखाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चारही आरोपींनी खाणे-पिणे कमी केले आहे. तुरुंगातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सध्या प्रत्येक दोषीसोबत चार ते पाच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्याची संवेदनशील स्थिती पाहता या दोषींनी परस्पर स्वतःचे बरे-वाईट करून घेऊ नये आणि त्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारेच शिक्षा मिळावी, यासाठी अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -'भारताची अर्थव्यवस्था एकट्या नरेंद्र मोदींनी संपवली आणि ते स्वतःला देशभक्त म्हणवतात!'
तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तुरुंगाचा दौरा करून दोषींना फाशी देण्याविषयीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, असलेल्या सोयींविषयी समाधान व्यक्त केले. याआधी दिल्लीतील एका न्यायालयाने निर्भया प्रकरणातील चारही गुन्हेगारांच्या फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक वॉरंट जारी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 18 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा -प्रियांका गांधी म्हणतात... होय, मोदी है तो मुमकीन है
हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर देशभरात बलात्काऱ्यांविरोधात तीव्र शिक्षेची मागणी जोर धरू लागली. त्यातच पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर देशभरातून निर्भयाच्या गुन्हेगारांच्या शिक्षेचीही अंमलबजावणी करण्याची मागणीही अधिक तीव्र बनली होती.