भंडारा -तिबेटचे ११ वे पंचम लामा यांच्या सुटकेसाठी तिबेटीयन लोकांनी नागपूर ते छत्तीसगड अशी पदयात्रा काढली आहे. या शांती मोर्चाच्या माध्यमातून भारत सरकार आणि लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला जाणार आहे.
रविवारी (२८ एप्रिल) त्रिमूर्ती चौकात पोहचताच भंडारा नगर परिषदेचे उपाध्यक्ष आशु गोंडाणे आणि इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. तुमच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही त्यांनी दिला. विदर्भात उष्णतेची लाट सुरु असतानाही या तीव्र उन्हात हे थंड हवामानाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी काढलेली पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पंचम लामा च्या सुटकेसाठी भर उन्हात नागपूर ते छत्तीगड पदयात्रा दलाई लामा यांच्या दुसऱ्या पीढीचे असलेले पंचम लामा यांना वयाच्या ६ व्या वर्षापासून चीनने कैदेत ठेवले आहे. आता २६ वर्षे झाले आहेत, तरीही पंचम लामा यांची सुटका करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी तिबेटीयन लोकांनी ही पदयात्रा सुरू केली आहे.
तिबेटच्या धार्मिक परंपरेनुसार धर्मगुरू दलाई लामा यांनी ग्येहून च्योकी यांची पंचम लामा म्हणून मान्यता दिली होती. मात्र, चीनला हे मान्य नव्हते. म्हणून चीनने त्यांना बंदी बनवून ग्यालत्सेन नोरबू याला पंचम घोषित कले. त्यांच्याद्वारे तिबेटमध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करून आपले राज्य स्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे या पदयात्रेतल्या तिबेटीयन नागरिकांनी सांगितले.
त्यामुळे चीनचा विरोध करण्यासाठी आणि ग्येहून च्योकी या पंचम लामाची सुटका करावी, यासाठी हे तिबेट बंधू देशातील विविध राज्यात पदयात्रा काढत आहेत. नागपूर ते छत्तीसगड, डेहरादून ते दिल्ली, म्हैसूर ते बंगलोर, या पायदळ मोर्च्याचे आयोजन त्यांनी केले आहे. या मोर्च्यात २० वर्षीय तरुणांसह ८१ वर्षीय आजोबासुद्धा आहेत.
खरेतर या विदर्भाच्या गर्मीत त्यांचे खूप हाल होत आहेत. मात्र, आपल्या होणाऱ्या धर्मगुरूंच्या सुटकेसाठी भारत सरकारचे आणि देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कठीण परिश्रमही ते पदयात्री करत आहेत.