श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात आज (मंगळवार) सकाळी, भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक झाली. यात भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. ही माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिली.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शोपियानच्या तुर्कवांगम भागात सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली होती. यादरम्यान या परिसरात लपलेल्या दहशतवांद्यांनी जवानांवर गोळीबार केला. तेव्हा जवानांनी ही चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
या घटनेच्या आधी, जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरच्या सीमेवरुन, पाकिस्तानकडून लहान-मोठ्या शस्त्राने गोळीबार करण्यात आला. भारताने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन अनेकदा करण्यात आले आहे. यात पाकने जून महिन्यात तब्बल २ हजार २७ हून अधिक वेळा याचे उल्लंघन केले आहे.