गोरखपूर- उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील 3 महिन्याच्या एका बाळाला कोरोनाची लागण झाली. दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर या बाळाची चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे. रविवारी या चिमुकल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हे लहान बाळ आणि त्याच्या आईची 12 एप्रिलला स्वॅब तपासणी केली असता, हे बाळ कोरोना पॉझिटीव्ह आले होते, तर माता निगेटिव्ह होती. बाबा राघव दास मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गणेश कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, डॉक्टरांसमोर एक मोठे आव्हान होते, कारण त्यांना केवळ बाळाला बरे करायचे नव्हते. तर, बाळाच्या आईला संसर्गाने कोरोनाची लागण होऊ नये, याचीदेखील काळजी घ्यायची होती
बाळाची आई आयसोलेशन वॉर्डमध्ये त्याची काळजी घेत होती. यासोबतच बाळाला दूध पाजताना किंवा त्याची स्वच्छता करताना रुग्णालयाने दिलेल्या सूचनांचे त्या पालन करत होत्या. बाळासोबत असताना त्यांच्या हातात सतत ग्लवज आणि तोंडाला मास्क असल्याचेही कुमार यांनी सांगितले.
बाळाला तापाशिवाय इतर काही समस्या नसल्यामुळे त्याला यासाठी काही औषधे देण्यात आली. स्वत: ची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने बाळ कोणतेही जास्त औषधोपचार न करता बरे झाले. कारण, आईच्या दूधामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढली, असेही कुमार यांनी सांगितले. दरम्यान घरी सोडल्यानंतरही बाळाची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालयाकडून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाताना आई आणि बाळाला जिल्हाधिकारी विजेंद्र पंडियान, आयुक्त जयंत नारळीरकर, डॉ. कुमार यांनी टाळ्या वाजवत निरोप दिला.