नवी दिल्ली - अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या मध्यस्थांच्या समितीने एका सीलबंद पाकिटात अहवाल सर्वोच्च न्यायालयात जमा केला आहे. यावर अहवालावर उद्या सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठाकडे हा अहवाल जमा करण्यात आला आहे. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीश आहेत. न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. ए. नझीर यांचा या पीठामध्ये समावेश आहे.
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची 10 मे ला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली होती.