नवी दिल्ली - केरळच्या एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या दोन कारवाईत त्यांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, बंदुकी, धारदार शस्त्रे यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी एनआयएच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलममध्ये छापा टाकला. या दोन कारवाईत एनआयएने पश्चिम बंगालमधून ६ तर केरळमधून ३ असे एकूण ९ संशयित दहशतवाद्यांना पकडले. हे संशयित दहशतवादी अल कायदासाठी काम करत होते. दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ला करण्यासाठी या दहशतवाद्यांना प्रेरित करण्यात आले होते, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलम येथे काही संशयित दहशतवादी लपले, असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा छापा टाकत त्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधून त्या संशयित दहशतवाद्यांना उकसवण्यात आले होते. त्यांना दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ला करण्यासाठी प्रेरित करण्यात आले होते, असे एनआयएच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
लेउ यीन अहमद आणि अबू सुफियान असे पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या २ संशयित दहशतवाद्यांची नावे आहे. यांच्याशिवाय आणखी चार जणांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. केरळमधून मोसराफ हुसैन आणि मुर्शीद हसन यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने या कारवाईत संशयित दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, बंदुकी, धारदार शस्त्रे यासह इतर साहित्य जप्त केले आहेत.