जयपूर -राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव म्हणजे सांभर तलाव. एरवी विविध देशी आणि विदेशी पक्षांसाठी स्वर्ग समजला जाणारा हा तलाव, सध्या त्यांच्यासाठी नरक ठरत आहे. कारण एक-एक करून हजारो पक्षी या तलावात मृत्युमुखी पडत आहेत. स्थानिकांच्या मते आतापर्यंत तब्बल आठ ते दहा हजार पक्षांचा या तलावात मृत्यू झाला आहे.
सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह.. तलावाशेजारील 'कोच्या की ढाणी' या परिसरात पक्षांचे मृतदेह मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता तलावाच्या जवळपास सर्वच भागात विविध पक्षांचे मृतदेह आढळून येत आहेत. सुरुवातीला असा अंदाज लावला जात होता की, साधारणपणे हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. मात्र स्थानिकांच्या मते, ज्या प्रमाणात पक्षांचे मृतदेह आढळून येत आहेत, त्यानुसार साधारणपणे दहा हजार पक्षांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही कितीतरी पक्षी इथे उपचाराअभावी तडफडत आहेत, मात्र संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कसे आणि काय उपचार करायचे याबद्दल माहितीच नाही!
एवढ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू होण्याची दोन प्रमुख कारणे पुढे येत आहेत. त्यातील एक कारण असे सांगण्यात येत आहे की, एखाद्या साथीच्या रोगामुळे या सर्व पक्षांचा मृत्यू झाला असावा. मात्र, परिसरातील वन्यजीव प्रेमी आणि पक्षीप्रेमींचे असे म्हणणे आहे, की तलावाशेजारी असलेल्या रिफायनरींमधून एखादा हानीकारक पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडला गेला असावा, ज्यामुळे पक्षांचा मृत्यू होत आहे.
या दोन शक्यता असल्या तरी, सध्या तरी ना वनविभाग याचे खरे कारण सांगू शकत आहे, ना पशुपालन विभाग. आतापर्यंत ज्या ज्या भागातून पक्षांच्या मृत्यूची बातमी आली आहे, त्या सर्व भागांमधील पाणी तपासणीसाठी पाठवले गेले आहे. यासोबतच, पक्षांच्या मृतदेहांनाही तपासणीसाठी भोपाळ आणि लुधियानामधील प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र, तलावाशेजारी तडफडत असलेल्या पक्षांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे मृत पक्षांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :आपल्या समृद्ध भाषिक परंपरा नष्ट व्हायला नको...