गुवाहटी -आसाम राज्यातील बम्हपुत्रा नदीसह अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. 30 जिल्ह्यांमधील नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. या आपत्तीत अत्तापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील दरांग आणि सोनितपूर जिल्ह्यातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.
ब्रम्हपुत्रा आणि तांगणी नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने दरांग जिल्ह्यातील पूर्वेकडील ग्रामीण भाग जलमय झाला आहे. पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सखल भागातील नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. साकोतला नदीच्या पाण्यामुळे मंगालदे आणि शिपाझार मतदारसंघात सगळीकडे पाणी साठले आहे. 'पुराचे पाणी माझ्या शेतात आले आहे. शेतातील सर्व पीक पाण्याने उद्धवस्थ झाले असून आमच्याकडे अत्यावश्यक वस्तू नाहीत. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुरात सापडलेल्या एका स्थानिक नागरिकाने केली.
सोनितपूर जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर आहे. जिल्ह्यातील बोरसोला भागात पुराने थैमान घातेल आहे. आत्तापर्यंत राज्यात पुरामुळे 89 नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 जिल्ह्यातील 55 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे, असे आसाम आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाने सांगितले.