नवी दिल्ली - संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या लढाईत आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. मात्र, दुर्देवाने रुग्णालयांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर काही व्यक्ती हल्ला करत आहेत. अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आज(बुधवार) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
जर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, त्यांच्या वाहनाची किंवा क्लिनिकची मोडतोड केली तर हल्लेखोरांकडून नुकसानीच्या दुप्पट रक्कम वसूल केली जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.
जे आरोग्य कर्मचारी देशाला कोरोनाच्या संसर्गपासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर दुर्दैवाने हल्ला होत आहे. असे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. यासाठी अध्यादेश काढण्यात आला असून राष्ट्रपतींच्या सहीनंतर तो लागू होईल.
साथीचा आजार कायदा 1897 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा अध्यादेशही लागू करण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आता अदखलपात्र गुन्हे समजला जाणार आहेत. अशा प्रकरणांची 30 दिवसांच्या आत चौकशी करण्यात येणार आहे. गुन्हेगाराला 3 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होवू शकते. तसेच 50 हजार ते 2 लाखांपर्यंतचा दंड करण्यात येऊ शकतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
अत्यंत गंभीर गुन्ह्यात गुन्हेगाराला 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होवू शकते. तर 1 लाख ते 5 लाखांपर्यंत दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.