नवी दिल्ली -कोरोना विषाणूची दहशत भारतामध्येही पसरली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा होळी खेळणार नाहीत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
जगभरातील तज्ञांनी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे,असे मोदींनी टि्वट केले आहे.
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर पोहचल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने इराण, इटली, जपान, दक्षिण कोरियाच्या नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोनाचा संसर्ग भारतात पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या देशांचे जे नागरिक अद्याप भारतात पोहोचलेले नाहीत, त्यांना मंजूर केलेले व्हिसा तात्पुरते स्थगित केले आहेत. मंत्रालयाने याबाबतची अॅडव्हायजरी मंगळवारी जारी केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला.