नवी दिल्ली - मोठे उद्योग, स्टार्टअप्स आणि शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्थांसह कमीतकमी 30 गट कोविड-19 वरील लस शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत, असा दावा भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) डॉ. के. विजय राघवन यांनी गुरुवारी केला. ते देशभरात चौथे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर औषधे, लस आणि तंत्रज्ञानाच्या नियामक यंत्रणेविषयी माध्यमांशी बोलत होते.
एआयसीटीई (AICTE) आणि सीएसआयआर (CSIR) यांनी यावरील औषध शोधून काढण्यासाठी ड्रग डिस्कव्हरी हॅकॅथॉन (युद्धपातळीवर औषध शोध) सुरू केले आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय औषधांच्या शोधाचे (computational drug discovery) प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
"भारतातील लस उत्पादन उच्च दर्जाचे आहे. 30 गटांपैकी 20 गट चांगल्या वेगाने कार्यरत आहेत. लस विकसित करण्यासाठी साधारणत: 10 वर्षे लागतात. परंतु, कोरोना विषाणूची लस एका वर्षात शोधणे हे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे," असे डॉ. राघवन म्हणाले. ‘लसीप्रमाणेच औषध विकसित करणे हेही खूप मोठे आव्हान आहे. त्यालाही खूप वेळ लागतो. जगभरात 100 लसींची चाचणी घेतली जात आहे. त्यासाठी 2 ते 3 अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केला जात आहे,’ असे ते म्हणाले.
याशिवाय, ‘कोविड-19 वरील लसीचा शोध लागल्यानंतरही ती सर्वांना उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान असेल. सध्या जगभरातील सर्वच देश कोरोनाने ग्रासले गेले आहेत. त्यामुळे लसीची आवश्यकता सर्वांनाच आहे. ती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान असणार आहे,’ असे राघवन म्हणाले.
"आपल्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि फार्मा उद्योग खूप सक्षम आहेत. हे सर्व जण या आजाराची लस मिळविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत," असे नीति आयोगाचे सदस्य आणि कोविड-19 च्या एम्पॉवर्ड ग्रुपचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. कोविड -19 शी लढण्यासाठी यासाठी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता, वेगवेगळ्या वस्तूंच्या पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग, कोविड रुग्णांचे ट्रॅकिंग आणि चाचणी करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 86 हजार 110 आहे. तब्बल 67 हजार 691 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 हजार 266 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 42.75 टक्के आहे. गंभीर बाब म्हणजे, भारतात मागील 9 दिवसांत 50 हजार नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. तर, यापूर्वी तब्बल 109 दिवसांत 1 लाख रुग्ण नोंदवले गेले होते.