मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस तत्काळ पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे सांगत त्यांनी भाजप सरकार बनवण्यास सक्षम नसल्याचे सांगितले. तसेच, आता आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, जनतेचे स्पष्ट बहुमत भाजपलाच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. यानंतर काही वेळात त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जमा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी तिसऱ्याच दिवशी २६ नोव्हेंबरच्या दुपारी बहुमत नसल्याचे सांगत राजीनामा दिला. यानिमित्ताने देशभरात आतापर्यंत औटघटकेचा कार्यकाळ निभावलेल्या मुख्यमंत्र्यांविषयी माहिती घेऊ.
१. सतीश प्रसाद सिंह (अंतरिम-बिहार)- २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी १९६८ (४ दिवस)
स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात औटघटकेचे मुख्यमंत्री म्हणून बिहारचे सतीश प्रसाद सिंह यांनी खाते उघडले. ते बिहारचे अंतरिम मुख्यमंत्री म्हणून २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी १९६८ दरम्यान केवळ ४ दिवस मुख्यमंत्री राहिले. ते कुशवाहा (कोएरी, वर्ण - क्षत्रिय) या अल्पसंख्य समाजातून आलेले मुख्यमंत्री होते.
ते सोहित समाज दलासोबत आघाडी आणि काँग्रेचा पाठिंबा मिळवून बिहारचे सहावे मुख्यमंत्री बनले होते. तसेच, ते इतर मागासवर्गीय समाजातून आलेले बिहारचे पहिलेच मुख्यमंत्री होते.
२. बिंदेश्वर प्रसाद (बिहार) १ फेब्रुवारी ते २ मार्च १९६८ (३० दिवस)
बिंदेश्वर प्रसाद हे बिहारचे ७ वे मुख्यमंत्री होते. १ फेब्रुवारी ते २ मार्च १९६८ या बिहारमधील राजकीय अस्थिरतेच्या काळात मुख्यमंत्री बनले होते. ते बिहारचे सातवे मुख्यमंत्री होते. ते यादव (चांद्रवंशी क्षत्रिय या ऐतिहासिक नावाने परिचित) अल्पसंख्य समाजातील होते. त्यांच्या आधी इतर मागासवर्गीय समाजातील मुख्यमंत्री सतीश प्रसाद सिंह यांना केवळ ४ दिवसांच्या कार्यकाळानंतर राजीनामा द्यावा लागला होता. बिंदेश्वर यांनाही ३० दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता.
३. सी. एच. मोहम्मद कोया (केरळ) १२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर १९७९ (५० दिवस)
चेरियन कंडी मुहम्मद कोया हे केरळाचे आठवे आणि मुस्लीम समाजातील पहिलेचे मुख्यमंत्री होते. ते १२ ऑक्टोबर १९७९ ला मुख्यमंत्री बनले. त्यांना ५० दिवसांतच म्हणजे १ डिसेंबर १९७९ ला राजीनामा द्यावा लागला.
४. ओमप्रकाश चौटाला (हरयाणा) १२ ते १७ जुलै १९९० (५ दिवस)
हरियाणाचे मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी २ डिसेंबर १९८९ ते २ मे १९९०, १२ १९९० ते १७ जुलै १९९०, २१ मार्च १९९१ ते ६ एप्रिल १९९१ अशा तुकड्या-तुकड्यांमध्ये मुख्यमंत्री पद भूषवले. यापैकी १२ ते १७ जुलै १९९० हा कार्यकाळ सर्वांत लहान म्हणजे ५ दिवसांचा होता. तर त्याहून थोडासा मोठा असलेला कार्यकाळ २१ मार्च ते ६ एप्रिल १९९१ हा १६ दिवसांचा होता. ते २ वोळा औटघटकेचे मुख्यमंत्री बनले.
अखेर २४ जुलै १९९९ ते ४ मार्च २००४ अशी ५ वर्षे ते हरियाणाचे मुख्यमंत्री झाले. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल एक घटक होते. ते तिसऱ्या आघाडीचे (बिगर रालोआ आणि बिगस काँग्रेस) राष्ट्रीय नेते होते.
चौटाला सध्या शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या ८४ वर्षांचे असून त्यांनी त्यांच्या शिक्षेपैकी ५ वर्षे पूर्ण केली आहेत. या कारणास्तव त्यांची पुढील शिक्षा कमी केली जाऊ शकते.
५. एस. सी. मारक (मेघालय) २७ फेब्रुवारी ते १० मार्च १९९८ (११ दिवस)
मेघालयचे माजी मुख्यमंत्री एस. सी. मारक १९९८ मध्ये सत्तेत आले होते. मात्र, त्यांच्या कार्याकाळातील केवळ ११ दिवस (२७ फेब्रुवारी ते १० मार्च) पूर्ण केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते मेघालयातील राजकारणात 'मिस्टर क्लीन' म्हणून ओळखले जातात. तसेच, त्यांना तेथील राजकारणात आदराचे स्थान आहे.
६. जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) ७ ते ३० जानेवारी १९८८ (२३ दिवस)
जानकी रामचंद्रन या १९८८ मध्ये तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्या ७ जानेवारी ते ३० जानेवारी १९८८ दरम्यान केवळ २३ दिवसांसाठी पदावर होत्या. केंद्र सरकारने कायदा आणि सुवव्यस्था विस्कळित झाल्याच्या कारणाने त्यांचे मंत्रीमंडळ आणि सरकार विसर्जित केल्यानंतर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्या अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले नेते एम. जी. रामचंद्रन यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांना व्ही. एन. जानकी या नावाने ओळखले जात असे.
७. जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १९९८ (३ दिवस)
जगदंबिका पाल हे केवळ ३ दिवस मुख्यमंत्रीपदी राहिले. उत्तर प्रदेशात १९९८ मध्ये राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंह यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व बाजू पलटली.
त्या वेळी कल्याण सिंह यांना रातोरात सत्तेवरून हटविण्यात आले आणि लोकतांत्रिक काँग्रेसचे जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. यानंतर भाजपने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. तेव्हा न्यायालयाने तातडीने संयुक्त विश्वासदर्शक ठरावाचा (कम्पोजिट फ्लोर टेस्ट) आदेश दिला. यामध्ये कल्याण सिंह यांना २२५ मते मिळाली तर, जगदंबिका यांना १९६ मते मिळाली. कल्याणसिंह यांना बहुमत मिळाल्याने जगदंबिका यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
जगदंबिका त्या वेळी कल्याण सिंह सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी विरोधकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले होते. त्या वेळी केंद्रात काँग्रेसने समर्थन दिलेले यूनायटेड फ्रंटचे सरकार होते आणि इंद्र कुमार गुजराल देशाचे पंतप्रधान होते. भारतीय जनता पक्षाची (भाजप) उत्तर प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी आमरण उपोषणाला बसले होते.
८. नितीश कुमार (बिहार) ३ ते १० मार्च २००० (७ दिवस)
बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार ३ मार्च ते १० मार्च २००० दरम्यान केवळ ७ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. नंतर ते पद सोडून पुन्हा केंद्रात गेले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री बनले.
९. बी. एस. येडियुरप्पा (कर्नाटक) १२ ते १९ नोव्हेंबर २००७ (७ दिवस)
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा १२ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २००७ दरम्यान राज्याचे २५ वे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, जेडीएसने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यांच्यामध्ये मंत्रीपदांच्या वाटणीवर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे १९ नोव्हेंबरला त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर येडीयुराप्पा १७ ते १९ मे २०१८ दरम्यान केवळ २ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमतापासून हा पक्ष ८ जागांनी दूर होता. येडीयुराप्पांनी १७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली.
राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडीयुराप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला. याविरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आमदार फोडण्याची शक्यता व्यक्त केली. तेव्हा न्यायालयाने येडीयुराप्पांना केवळ २४ तासांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. यानंतरच्या विश्वासदर्शक ठरावानंतर बहुमत सिद्ध न झाल्याने सरकार कोसळले आणि येडीयुराप्पांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र, ते केवळ १३ महिनेच टिकले.
१०. देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र) २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ (३ दिवस)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतल्यानंतर त्यांना ३ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. कर्नाटकच्या येडीयुराप्पांनंतर ते सर्वांत कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर फडणवीस मुख्यमंत्री बनले होते. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला.