नवी दिल्ली - जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली असून मृतांचा आकडा 19 हजाराच्या पुढे गेला आहे. चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात सर्वात प्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. मात्र, या विषाणूचा उगम चीन आहे, असा एकही पुरावा पुढे आला नाही, असे भारतातील चीनी दुतावासाने म्हटले आहे.
अमेरिका, युरोप, चीन, जपान येथील संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाचा उगम निश्चित कोठे झाला हे सांगितले नाही. वुहानमध्ये जरी कोरोनाचा सर्वात प्रथम प्रसार झाला असला तरी चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला, यास पुरावा नाही. चीनी नागरिकही कोरोनाचे बळी ठरले आहेत, असे भारतातील चीनी दुतावासाने म्हटले आहे.
चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा वुहान शहरातील प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. उलट खोटी माहिती पसरवत असल्यावरून डॉक्टरांना तंबी दिली. पुढे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झाला, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट पसरली होती.