नवी दिल्ली - काश्मीरमध्ये सध्या लोकांवर कोणतीही बंधने नाहीत. कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला आता जगभरातून पाठिंबा मिळत आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे, येत्या ५ ते ७ वर्षांमध्ये काश्मीर हा भारतातील सर्वांत विकसित असा भाग असेल असे शाह म्हणाले. यासोबतच, विरोधी पक्ष काश्मीरबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली.
'काश्मीरमधील लोकांवर बंधने नाहीत, विरोधक चुकीची माहिती देताहेत'
कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. तिथे सर्व सुरळीत चालू असून, विरोधी पक्ष केवळ चुकीची माहिती पसरवत असल्याचे अमित शहांनी आज स्पष्ट केले.
हेही वाचा : जम्मूमध्ये चकमकीपूर्वी महिला अधिकाऱ्यांचा दहशतवाद्यांना अखेरचा इशारा, पहा व्हिडिओ
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचा उल्लेख करत ते म्हणाले, जगातील सर्व मोठे नेते न्यूयॉर्कमध्ये सात दिवसांसाठी एकत्र जमले होते. यांपैकी एकाही नेत्याने काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला नाही, हेच मोदींचे यश आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये काश्मीरमध्ये ४१,८०० लोकांनी आपला जीव गमावला आहे. तिथे प्राण गमावलेल्या जवानांबद्दल, त्यांच्या विधवांबद्दल किंवा त्यांच्या अनाथ झालेल्या मुलांबद्दल कोणीही बोलत नाही. त्या जवानांचा जीवित राहण्याचा मूलभूत हक्क किंवा मानवाधिकाराबाबत कोणी बोलत नाही. मात्र, मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट सेवा नसल्याचे सांगत काही लोक मानवाधिकाराचे उल्लंघन झाले म्हणत गळे काढत आहेत. मोबाईल नेटवर्क नसणे हे मानवाधिकारांचे उल्लंघन नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या दोन महिन्यांमध्ये काश्मीर खोऱ्यात १०,००० नवे टेलिफोन कनेक्शन आणि ६,००० नवे पी.सी.ओ. उपलब्ध करुन दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : 'केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू', प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल