जयपूर -११ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या आठवणी आजही तिथल्या लोकांच्या मनात ताज्या आहेत. १३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या हल्ल्यातील पाच आरोपींचे भवितव्य आज (बुधवार) ठरणार आहे.
हेही वाचा : निर्भया स्मृतिदिनः बलात्कार गुन्ह्यांची समस्या कायम
या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते. या हल्ल्यातील आरोपींमध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये राहणारा शाहबाज हुसैन आणि आजमगढ मध्ये राहणारे मोहम्मद सैफ, सरवर आजमी, सैफुर्रहमान आणि सलमान या पाच जणांबाबत आज सुनावणी होईल. या हल्ल्यातील आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. तसेच, शादाब, मोहम्मद खालिद आणि साजिद हे तिघे सध्या फरार आहेत.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी सांगानोरी गेट परिसरातील हनुमान मंदिर परिसराला भेट दिली. या मंदिरामध्ये आजही या हल्ल्याच्या खुणा पाहायला मिळतात. मंदिराबाहेर प्रसादाचे दुकान असणाऱ्या एका व्यापारी महिलेचा पती, मुलगा आणि आणखी एक नातेवाईक या हल्ल्याचे बळी ठरले होते. या घटनेबाबत बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. या हल्ल्यातील सर्व दोषींना फाशी दिली पाहिजे, तसेच फरार आरोपींनाही लवकरात लवकर पकडून शिक्षा दिली जावी, अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे.
हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका