महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान : जे. के. लोन रुग्णालयात 100 बालकांचा मृत्यू , विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील कोटा जिल्ह्यामधील बालकांच्या मृत्यूचा आकडा वाढत जाऊन 100 वर पोहोचला आहे.

गेहलोत
गेहलोत

By

Published : Jan 2, 2020, 5:48 PM IST

जयपूर - राज्यातील कोटा जिल्ह्यामधील बालकांच्या मृत्यूचा आकडा वाढत जाऊन 100 वर पोहोचला आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि बसपा प्रमुख मायवती यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावर 'हे प्रकरण संवेदनशील असून यावर राजकारण करू नये', असे गेहलोत यांनी टि्वट करून म्हटले. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बालकांच्या मृत्यूप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

जे. के. लोन रुग्णालयातील बालकांचा मृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. यावर राजकारण करू नये. या रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची संख्या कमी होत आहेत. आम्ही ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू. आई आणि बाळाचे आरोग्य निरोगी राहावे यालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये सर्वप्रथम आम्ही बालकांसाठी ICU ची स्थापना केली होती. आमच्या सरकारच्या काळात ऑपरेशन थिएटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. बालकांचा मृत्यू दर घटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निरोगी राजस्थान हीच आमची प्राथमिकता आहे. माध्यामांनी दबावाखाली न येता, सत्य वार्तांकन करावे, असेही गेहलोत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.'जे. के. लोन रुग्णालयातील बालकांचा मृत्यू प्रकरणी गेहलोत यांना पत्र पाठवले. त्यांना रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा बळकट करण्याचे आवाहन केले आहे', असे ओम बिर्ला यांनी टि्वट केले.
रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूची घटना दुःखद आहे. याप्रकरणी राजस्थान सरकार अंसेवदनशील असून निष्काळजीपणाने वागत आहे. पक्षाचे शिर्ष नेतृत्वाने यावर मौन साधले आहे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमधील पीडितांची त्यांनी भेट घेतली. त्याच प्रकारे रुग्णालयातील मृत पावलेल्या बालकांच्या आईची त्यांनी भेट घ्यायला हवी होती, असे मायवती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
सोनिया गांधी यांनी बालकांच्या मृत्यूप्रकरणी पक्षाचे प्रभारी अविनाश पांडे यांच्यामार्फत नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया यांनी गेहलोत सरकारकडे अहवाल मागितला आहे. गेल्या रविवारी बालकांच्या मृत्यूप्रकरणी अशोक गेहलोत यांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते. राज्यात प्रत्येक वर्षी जवळपास 1 हजार 500 मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण होते. मात्र, या वर्षी हे प्रमाण फक्त 900 आहे. देशातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 4 ते 5 मुलांचा मृत्यू होतो. त्यात नवे काय आहे, असे गेहलोत म्हणाले होते. त्यावरूनही त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details