कोलकाता -एका खासगी रूग्णालयात ३२ वर्षीय थाय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. हा संशय खरा ठरल्यास, कोरोना विषाणूचा हा भारतातील पहिला बळी ठरू शकतो. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूने १०६ नागरिकांचा बळी घेतला आहे.
रूग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पोटाच्या विकारासाठी २१ जानेवारीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. सोबतच नॉशिया (उलटीची भावना आणि मळमळ) आणि तापही असल्यामुळे तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. १८ जानेवारीपासूनच तिला ताप, मळमळ आणि पोटदुखी होत होती. हा त्रास वाढल्यामुळे २१ तारखेला रात्री तिला रुग्णालयात आणले गेले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ती थायलंडमधून भारतात आली होती. भारतात येण्याआधी तिने नेपाळमध्येही मुक्काम केला होता.