नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला होता. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळाला लक्ष्य करण्यात आले होते. बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या कारवाईवर इटलीच्या पत्रकार फ्रान्सेसा मॅरिनो (Francesca Marino) यांनी मोठा खुलासा केला आहे. बालाकोटमधील स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने 'भारताच्या हल्ल्यात जैशचे १३० ते १७० दहशतवादी मारले गेले. यात उपचारादरम्यान मरण पावलेल्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. पाकच्या लष्करी कॅम्पच्या रुग्णालयात अद्यापही सुमारे ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारांदरम्यान २० जण मरण पावले,' अशी माहिती मॅरिनो यांनी लिहिली आहे.
'उपचारांनंतर जे दहशतवादी बरे झाले, त्यांना पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही,' असे मॅरिनो यांनी म्हटले आहे. मॅरिनो यांनी अनेक आठवडे शोध घेतल्यानंतर सूत्रांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती संकलित केली आहे. 'ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी ११ प्रशिक्षक होते. मृतांमध्ये काही बॉम्ब बनवणे आणि हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण देणारेही लोक होते,' अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना दिली भरपाई
मॅरिनो यांच्या माहितीनुसार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची माहिती गुप्त ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. 'ज्या कुटुंबांमधील लोक या हल्ल्यात मारले गेले, त्यांच्याविषयी कोणतीही माहिती बाहेर 'लीक' होऊ नये, यासाठीही जैश-ए-मोहम्मदने पूर्ण बंदोबस्त केला आहे. मृतांच्या घरी जाऊन जैश संघटनेच्या इतर दहशतवाद्यांनी नुकसान भरपाईदेखील दिली आहे.' २६ फेब्रुवारीच्या कारवाईचा उल्लेख करताना 'भारतीय वायू सेनेने पहाटे साडेतीन वाजता हल्ला केला. मला मिळालेल्या माहितीनुसार, शिंकयारी लष्करी कॅम्पहून सेनेची एक तुकडी घटनास्थळी पोहोचली,' अशी माहिती मॅरिनो यांनी दिली.