हैदराबाद - महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्याच्या घटनेबाबत देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात प्राथमिक आरोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा दाखविल्याच्या कारणावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहे. ही कारवाई सायबराबाद पोलीस आयुक्तांनी केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक एम. रवी कुमार आणि पोलीस हवालदार पी. वेणू गोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनर यांनी सांगितले. प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ का लागला, याबाबत सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. सर्व सायबराबाद पोलीस अधिकाऱ्यांना हद्द न पाहता तातडीने गंभीर गुन्ह्यांचे आरोपपत्र दाखल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा-पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचे आंदोलन
महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून झाल्याच्या घटनेनंतर तेलंगणामध्ये विविध ठिकाणी शनिवारी निदर्शने करण्यात आली आहेत. तर दिल्लीसह देशाच्या इतर भागातही बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली आहेत. युवक काँग्रेसने दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे निदर्शने केली आहेत.