हैदराबाद - हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी निषेध नोंदवला आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
गांधी रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशा प्रकारच्या घटनांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करू, असे तेलंगाणाचे आरोग्यमंत्री इटाला राजेंद्र यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, की जे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवत आहेत, त्यांना मारहाण करून काय मिळणार आहे? संपूर्ण जग एका मोठ्या संकटाला तोंड देत आहे. अशा वेळी डॉक्टरांवर हल्ला करण्यासारखे प्रकार हे निंदनीय आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची आम्ही खबरदारी घेत आहोत. डॉक्टरांनी निर्भयपणे आपले काम करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
बुधवारी हैदराबादच्या गांधी रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी विलगीकरण केंद्रामधील एका डॉक्टरवर हल्ला करत त्याला मारहाण केली होती.
हेही वाचा :तुम्ही घरी थांबाल तरच कोरोना हरेल, पाच वर्षाच्या चिमुकलीचा संदेश