हैदराबाद - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकण्यास बंदी असलेले खोकल्याचे औषध अनधिकृतपणे विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद शहरातील गोशामहल भागातील दारुसलेम येथील अगरवाल फार्मसीच्या दुकानावर पोलीस पथकाने कारवाई केली. या व्यक्तीने अनेक अल्पवयीन मुलांना आणि इतरांना खोकल्याचे औषध विकल्याचे समोर आले आहे. या औषधाचा वापर नशा म्हणूनही करण्यात येतो. तसेच त्याचे व्यसन लागून शरीरावर वाईट परिणाम होतात.
शहरातील मध्य पोलीस विभागाच्या टास्क फोर्सने गुप्त माहितीच्या आधारे ही कारावाई केली. पोलिसांसोबत औषध विभागाचे अधिकारीही होते. जयंत अगरवाल या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय जास्त किमतीला हे औषध त्याने अनेक अल्पवयीन मुलांना आणि व्यक्तींना विकल्याचे तपासात समोर आले आहे.