नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका फेटाळली आहे. तेलंगणामध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. हे चारही जण पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. मानवाधिकार समितीतर्फे या एन्काऊंटरच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने कार्यकर्ते के. सजाया यांना तेलंगणा उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्यास सांगत सर्वोच्च न्यायालयात आलेली याचिका फेटाळली. या एन्काऊंटरसंबंधातील पुरावे तेलंगणा उच्च न्यायालयासमोरच सादर करावेत, असे या पीठाने म्हटले.
तेलंगणामध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तसेच, तिचा मृतदेह जाळून टाकला होता. तेलंगणातील शमसाबाद येथे २७ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी तिचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशावुलू यांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांतच हे चारही जण पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
मानवाधिकार समितीतर्फे या एन्काऊंटरच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. तसेच, या एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. यानंतर न्यायालयाने ३ सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.