हैदराबाद -तेलंगणामध्ये एका महिला तहसीलदाराला पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एका तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकल्याची घटना घडली. करीमनगर जिल्ह्यातील चिगुरुमामिडी येथील तहसील कार्यालयामध्ये ही घटना घडली.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन व्यवहारांसंबधी पासबुक मंजूर करत नसल्यामुळे, एका शेतकऱ्याने हा हल्ला केला गेला. दोन भावांमध्ये या जमीनीसंदर्भात वाद सुरू असल्यामुळे पासबुक मंजूर करता येत नसल्याचेही या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
याआधी रंगारेड्डी जिल्ह्यात अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसीलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्याची घटना ४ नोव्हेंबरला घडली होती. यातील आरोपीने तहसीलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर स्वतःलाही त्याने पेटवून घेतले होते. यावेळी विजया यांना वाचवण्याच्या प्रयत्नात होरपळला गेलेला त्यांचा चालक गुरुनाथम, याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
तेलंगणामधील घटनेने घाबरून जात, आंध्र प्रदेशच्या कुर्नुल जिल्ह्यातील पट्टीकोंडा मंडळ तहसील कार्यालयाच्या तहसीलदार उमा माहेश्वरी यांनी आपल्या कक्षाच्या बाहेर दोरी बांधली होती. त्यांच्या कक्षात जाण्यास सर्वांना, अगदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला होता. आवश्यक त्या कागदपत्रांची देवाणघेवाण ही दाराच्या बाहेरूनच करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा तेलंगणामध्ये असाच प्रकार घडला आहे.
हेही वाचा :'त्या' तहसीलदारांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीचा रुग्णालयात मृत्यू