पाटणा -सध्या श्रावण महिना सुरू आहे. यानिमित्ताने लालु प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने चक्क भगवान शंकरसारखा वेश करत पाटणा येथील मंदिरात पूजा केली.
भगवान शंकरासारखी वेशभूषा करण्यासाठी तेजप्रतापने पांढरे धोतर, कंबरेवरती वाघाच्या कातड्यासारखा कपडा आणि शरीरावरती राखेने पट्ट्या मारल्या होत्या. यासोबत रुद्राक्षाच्या माळाही घातल्या होत्या. मंदिरात येताना तेजप्रतापसोबत सुरक्षारक्षकही होते. शंकराचे रुप घेऊन आलेल्या तेजप्रतापने दूध आणि गंगाजल अर्पण करत मंदिरात पूजा केली.
पूजा संपल्यानंतर तेजप्रताप यादव म्हणाले, बिहार आणि संपूर्ण भारताच्या कल्याणासाठी पूजा केली आहे. सर्वजणांनी शांतेत, सुखात आणि कोणत्याही अडचणी आणि अडथळ्यांशिवाय राहावे आणि माझ्या वडिलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी मी प्रार्थना केली आहे.
गेल्यावर्षीही तेजप्रतापने श्रावण महिन्यात भगवान शंकरासारखी वेशभूषा करत पूजा केली होती. यासोबतच लालुंच्या निवासस्थानाबाहेर तेजप्रताप भगवान शंकर आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी ऐश्वर्या पार्वतीच्या रुपात असलेले पोस्टर लावण्यात आले होते. तर, २०१७ साली नववर्षाच्या स्वागतासाठी तेजप्रतापने भगवान श्रीकृष्णासारखी वेशभूषा केली होती.