नवी दिल्ली - बिहार निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहेत. भाजपाविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्षांनी एकत्र येत महागठबंधन केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून त्यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन निवडणूक लढणार आहे. तेजस्वी यांच्या प्रचार अभियानाअंतर्गत एक गाणे लाँच करण्यात आले आहे. हे प्रचार गाणे 3.16 मिनिटांचे असून, 'भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन..' असे या गाण्याचे बोल आहेत.
तेजस्वी यादव यांच्यासह व्हिडीओमध्ये तेजप्रताप यादव हेही पाहायला मिळतात. तसेच, जगदानंद सिंह आणि रामचंद्र पूर्वेही व्हिडीओमध्ये दिसतात. तर व्हिडीओच्या शेवटी 'तेजस्वी भव: बिहार' असे लिहिण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी आरजेडीने 'विजयी होगा बिहार' हे गाणे लाँच केले होते.