गांधीनगर :गुजरातच्या आनंद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'पब्जी' खेळण्यावरुन रागावल्याने एका १७ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने आपल्या शेतामधील कीटकनाशाक पिऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे वडील शिक्षक आहेत. सारखा सारखा पब्जी गेम खेळतो यामुळे ते आपल्या मुलावर ओरडले होते. त्यानंतर त्यांनी त्याचा मोबाईलही काढून घेतला होता. याचा राग मनात धरून, तो मुलगा आपल्या शेतात गेला आणि तिथे असलेले कीटकनाशक पिऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यानंतर घरी परतल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. तेव्हा त्याच्या आई-वडिलांना त्याने कीटकनाशक प्राशन केल्याचे समजले. त्यांनी तातडीने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. उमरेथ पोलीस ठाण्याचे उप-निरीक्षक पी. के. सोधा यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तसेच अधिक तपास सुरू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारने पब्जीसोबतच ११८ चीनी अॅप्सवर बंदी आणली आहे. देशातील नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी आणि देशाचे सार्वभौमत्व राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट झाले 'हॅक'!