रायपूर (छत्तीसगड)-मागास समाजाच्या एका विद्यार्थीनीने वाढलेले जेवण खाण्यास शिक्षिकेने नकार दिला. एवढेच नाही तर विद्यार्थिनेने शिवलेल्या त्या ताटाची आठवण रहावी म्हणून ताटालाही खूण करुन ठेवण्यास सांगितले. शासकीय पूर्व माध्यमिक विद्यालय सूरजपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित विद्यार्थिनी ८व्या वर्गात शिकते. ९ एप्रिलला मध्यान्ह भोजन करताना काही शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थीनींना भोजन वाढण्याचे सांगितले होते. त्यावेळी पीडितेने सूरजमणी कुशवाहा या शिक्षिकेला ते भोजन दिले. त्यावेळी त्या शिक्षिकेने ही विद्यार्थीनी हरिजन आहे हिच्या हातचे जेवण आपण खाणार नाही, असे म्हटले. तर, वाढलेले ते ताट परत नेण्यास पीडितेला सांगितले.
पहा पीडितेचे आणि शिक्षकाचे काय म्हणणे आहे
या प्रकरणीची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्या पीडित विद्यार्थीनीने वाढलेल्या ताटालाच शिक्षिकेने खूण करण्यास सांगितले. या घटनेनंतर विद्यार्थिनी अत्यंत दुखी झाली. या संपूर्ण घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर तिने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच लिखीत स्वरुपात तक्रार नोंदवून शिक्षिकेवर योग्य ती कारवायी करण्याची मागणी केली आहे. तर, त्या शाळेत आपल्याला शिकायचे नाही, अशी इच्छाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर, शाळेतील काही शिक्षकांनीही आरोपी शिक्षिकेची वागणूक चांगली नसल्याचे म्हटले आहे. त्या शिक्षिका उच्च समाजातून येतात म्हणून आम्ही त्यांचा विरोधही करु शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे पंतप्रधान मोदी वंचित समाजातील सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात. तर, देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागास समाजातून येतात. मात्र, असे असतानाही या समाजाची स्थिती सुधारल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र आहे.