नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून भारतातील शांतता भंग करण्यामागे आयएसआयचा हात असल्याचा आरोप तारेक फतेह यांनी केला आहे. तारेक हे कॅनडियन लेखक आहेत, त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. इंदूरमध्ये एका साहित्यमेळ्यासाठी ते आले होते. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच समान नागरी कायदा आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन करणारे लोक हे खोटं बोलत आहेत, जर मुस्लिम या देशात सुरक्षित नसते, तर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हे अस्तित्वातच नसते. तसेच, विद्यापीठाच्या मुद्रेवर 'अल्लाह-हू-अकबर' असे लिहिलेले नसते, अशी प्रतिक्रिया तारेक यांनी या आंदोलनांबाबत दिली.
ते पुढे म्हणाले, की या कायद्याचा भारतातील नागरिकांवर काहीही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, मुस्लिम कट्टरतावादी तसेच जामिया आणि अलीगढ विद्यापीठांमध्ये बसलेले लोकच या गोष्टीचा बाऊ करत आहेत. त्यांचा भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही. तसे असते, तर जामिया विद्यापीठात मुस्लिमांसाठी ५० टक्के आरक्षण दिले गेले नसते.
हे लोक अर्बन नक्षल आहेत. भरपूर श्रीमंत असलेले आणि स्वतःला मार्क्सवादी म्हणवणारे हे लोक एकही पुस्तक न वाचता सीएएला विरोध करत आहेत. भारतापासून वेगळे होऊन जर तुम्ही स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र स्थापन केले आहे, तर तुम्हाला परत भारतात का यायचे आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, की जर भारत 'हिंदू राष्ट्र' होणार नाही, तर कोणते राष्ट्र होईल? हिंदूस्तानाच्या इतिहासात आणि परंपरेमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : बाय बाय 2019 : सरत्या वर्षामध्ये घडलेल्या 10 महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी