वॉशिंग्टन- मुत्सद्दी तरणजितसिंग संधू यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. अमेरिकेतील मिशनचे उपप्रमुख अमित कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनी संधूंचे जोरदार स्वागत केले. याआधी या पदावर हर्षवर्धन श्रृंगला होते. त्यांची आता परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
अमेरिकेतील भारतीय दूतावासाने याबाबत ट्विट करत माहिती दिली. "अमेरिकेतील भारताचे दूत म्हणून नियुक्त झालेले तरणजित सिंग संधू यांनी आज भारतीय दूतावासात आपला पदभार स्वीकारला. अमेरिकेतील मिशनचे उपप्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले", अशा आशयाचे ट्विट दूतावासाने केले आहे.