चेन्नई - तामिळनाडूमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुजित विल्सन असे २ वर्षीय मुलाचे नाव असून तब्बल ८० तास चाललेल्या बचावकार्यानंतर त्याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सुजितचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह विघटित अवस्थेत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मृतदेह रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आला आहे.
तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती - #SujithWilson
सुजितचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह विघटित अवस्थेत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मृतदेह रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आला आहे.
सुजित २५ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेळता-खेळता या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी अथकपणे बचावकार्य सुरू होते. मात्र, त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती. त्याचा मृतदेह विघटित अवस्थेत हाती आला आहे. बचावकार्य सुरू असताना ६५ फुटांपर्यंत खोदकाम केल्यानंतर सडलेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली. यानंतर बचावकार्य थांबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. परिवहन विभागाचे मुख्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी मंगळवारी पहाटे ही माहिती दिली.
सुजितला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तीन दिवसांहून अधिक काळ बचावकार्य सुरू होते. त्याला बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी वैद्यकीय पथकही बोलावण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचीही (एनडीआरएफ) सहा पथके सज्ज होती. मात्र, अखेर ही झुंज अपयशी ठरली.