नरसिंहपूर -हिंदूंचे आद्य धर्माचार्य शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी राम जन्मभूमीवरून केंद्र सरकार आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार आणि आरएसएसने रामजन्मभूमीच्या मर्यादेच खंडन केल्याचा आरोप शंकराचार्य यांनी केला आहे. ते म्हणाले, हिंदूंच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्यांना लोकांनाच राम मंदिर ट्रस्टमध्ये जागा मिळाली आहे. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर स्मारक नव्हे तर मंदिरच निर्माण व्हायला हवे. राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असून राम मंदिराच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी येत्या १५ मार्चला परमहंसी गंगा आश्रमात संतांचं महासंमेलन होणार असल्याचे ते म्हणाले.
नरसिंहपूरच्या ज्योर्तेश्वर परमहंसी गंगा आश्रमात हिंदूंचे आद्य धर्माचार्य शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधला. ते म्हणाले, आरएसएसची मानसिकता सनातन धर्मविरोधी आहे. ते हिंदूंना सनातनी मानत नाहीत. स्मारकाच्या नावावर फक्त श्रेय घेण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले आहे. राम मंदिराचा मुद्दा हा ऐतिहासिक काळापासून सुरू आहे तर, आरएसएसचा इतिहास हा फक्त १०० वर्षे जुना आहे. त्यामुळे तेथे स्मारक नाही तर मंदिराचेच निर्माण व्हायला हवे असे म्हणत त्यांनी, राम जन्मभूमी मंदिर निर्माणच्या ट्रस्टमध्ये विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसच्या लोकांना सम्मिलीत करण्यावर आक्षेप घेतला.