पाटणा -आपल्या मुलाने जे काही केले ते अगदी प्रामाणिकपणे केले आणि त्यामुळे त्याच्याशी न्याय होईल, अशी आशा आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांच्या आईने व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासल्यामुळे त्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर ईटीव्ही भारतच्या पत्रकारांनी मोहसिन यांच्या आईची भेट घेतली. त्यांनी मोहसिन बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
कर्नाटक कॅडरच्या १९९६ बॅचचे आयएएस अधिकारी मोहसिन यांना निवडणूक अधिकारी म्हणून ओडिशा येथे तैनात करण्यात आले होते. मंगळवारी संबल येथे पंतप्रधान मोदींची सभा होती. दरम्यान मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासाचे आदेश दिले होते. यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने कारवाई करत त्यांना निलंबीत केले.
या घटनेनंतर ईटीव्हीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांची आई आणि धाकट्या भावाने मोहम्मद बद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्यात. माझ्या मुलाने संपूर्ण आयुष्य प्रामाणिक काम केले आहे. यावेळीही तो प्रामाणिक नोकरी बजावत होता. मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात आली. परंतू त्याच्यासोबत न्याय होईल एवढेच आम्हाला अपेक्षा आहे.
मोहम्मद मोहसिन यांच्या कुटुंबियांची मुलाखत
मोहम्मद मोहसिन सध्या ओडिशा येथील आयएएस ट्रेनिंग कॅम्पमध्येच आहेत. निलंबन झाल्यानंतर ते घरी परतलेले नाही. धाकट्या भावाचेही त्यांच्यासोबत फोनवरूनच बोलणे झाले आहे. मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्यामुळे निलंबित झाल्यावरून सर्वाना धक्का बसला आहे.
मोहसिन यांना नक्कीच महत्वाची माहिती मिळाली असावी. त्यावरूनच त्यांनी तपासाचे आदेश दिले असावेत. या कारवाईवरून त्यांची स्तुती व्हायला हवी होती. मात्र, त्यांच्या विरोधातच कारवाई करण्यात आली. हे धक्कादायक आहे, असे त्यांचे धाकडे बंधू मोहम्मद शाहिद यांनी सांगितले. मला आपल्या भावाच्या कामावर गर्व आहे, असेही त्यांनी सांगितले.