नवी दिल्ली -ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 'आप'चा निलंबित नगरसेवक ताहीर हुसेनला अटक केली आहे. ताहीर हुसेनने 'राऊज एव्हेन्यू न्यायालयात' आत्मसमर्पण करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालायने आत्मसमर्पण अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. तसेच अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही वाचा-दिल्ली हिंसाचार: ५३१ खटले; तर १ हजार ६४७ अटकेत, ताहिर हुसेन फरारच
गुप्तचर विभागातील अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या केल्याचा आरोप ताहीर हुसेनवर आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंकित शर्मा यांचा मृतदेह चांदबाग येथील नाल्यात आढळून आला होता. अंकितच्या कुटुंबीयांनीही हत्येचा आरोप ताहीर हुसेनवर केला होता. मात्र, हिंसाचारानंतर तो फरार होता. पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो सापडत नव्हता. आज त्याने आत्मसमर्पण करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, राऊज एव्हेन्यू न्यायालयाने हे प्रकरण कक्षेत येत नसल्याचे म्हणत अर्ज स्वीकारला नाही. त्यानंतर करकरडुमा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही वाचा-दिल्ली हिंसाचारातील शाहरुखचा थाट..! ४ गर्लफ्रेंड.. शाही पार्ट्या अन् जिमचे फॅड
हुसेन याने मंगळवारी आपल्या वकिलांकरवी अटकपूर्व जामीन याचिका न्यायालयात दाखल केला होती. अंकित शर्मा यांची हत्या झाली त्या ठिकाणाच्या जवळपास ताहीर हुसेन उपस्थित नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. तसेच फरार नसल्याचेही न्यायालयात सांगितले होते. २४ फेब्रुवारीला माझ्या अशीलाच्या कंपनीवर हल्ला झाला तेव्हा पोलीसही घटनास्थळी आले होते. त्यानंतर घराची चावी पोलिसांकडेच होती. दुसऱ्या दिवशी हुसेन यांनी घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीमुळे जाता आले नाही, असे न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी सांगितले होते.