पणजी - पर्यावरणाशी तडजोड न करता खाण सुरू करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्रकल्प उभारत असताना त्याचा लाभ होणार नसेल तर गोव्याचा विकास नको, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे केले.
सुरेश प्रभु पत्रकार परिषदेत बोलताना भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रभू म्हणाले, खाण, पर्यटन, मच्छीमारी हे गोव्यातील महत्त्वाचे व्यवसाय आहेत. पर्यावरणाशी कोणतीही तडजोड न करता खाण सुरू करण्यावर भाजपचा भर आहे. कारण हा आर्थिक ऐवजी मोठा सामाजिक प्रश्न आहे.
सुरेश प्रभू म्हणाले, जेव्हापासून केंद्रामध्ये भाजप सत्तेत आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने बदल होत आहेत. भारताकडून चीनला होणारी निर्यात वाढली आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणुकीत सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. रेल्वेमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देताना देशाची सीमाही सुरक्षित करण्यावर भर दिला आहे.
विकास करत असताना पर्यावरणाचा विचारही केला जात असून नवा भारत घडविण्याचा आमचा उद्देश आहे, असेही प्रभू म्हणाले. दरम्यान, देशातील उरलासुरला काळापैसा बाहेर काढण्यासाठी आणखी एकदा नोटाबंदी करण्याची गरज आहे का? असे विचारले असता प्रभू यांनी त्यावर अधिक भाष्य केले नाही. प्रभू भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले असून सभेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधणार आहेत.