नवी दिल्ली -ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेना यांना विदेशात जाऊन उपचार घेण्यासाठी परवाणगी देणाऱ्या दिल्ली न्यायालयाच्या निर्णायाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली.
दिल्ली न्यायालयाने 10 जुनला राजीव सक्सेना यांना आजारी असल्यामुळे 25 जुन ते 27 जुलैदरम्यान यूके आणि दुबई येथे उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली होती. याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने एम्सच्या संचालकाना वैद्यकीय मंडळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही, तर राजीव सक्सेना यांच्या आरोग्यासंदर्भातील अहवाल तीन आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता यासंदर्भातील पुढील सुनावणी तीन अठवड्यानंतर होणार आहे.
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात राजीव सक्सेनांवर ९० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच सक्सेनाचे दुबईतून भारतात प्रत्यर्पण करण्यात आलेले होते. सक्सेनासोबत दीपक तलवारलाही भारतात आणण्यात आले होते. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेललाही यापूर्वीच भारतात आणण्यात आले आहे.