नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेला पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी (एसआयटी) करण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दुबेच्या पाच साथीदारांना पोलीस चकमकीत ठार करण्यात आले याचीही चौकशी व्हावी, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि ए. एस बोपन्ना यांच्या त्रिसदस्यीय पीठाकडून व्हि़डिओ कॉन्फरन्सिगंद्वारे हे प्रकरण सुनावणीला घेण्यात येणार आहे. घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून प्रकरण तत्काळ सुनावणीला घेण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती.
विकास दुबेला कानपूरमधील बिकारु या त्याच्या गावी अटक करण्यासाठी 2 जुलैच्या रात्री पोलीस गेले होते. मात्र, पोलीस येण्याची कुणकूण लागताच त्याने साथीदारांसह पोलिसांवर हल्ला केला. पोलीस येताच गुंडानी गोळीबार केला. यात 8 पोलीस ठार तर, अन्य 7 जण जखमी झाले. घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह पळून गेला होता.
उत्तर प्रदेश पोलीस आठ दिवस विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत होते. मात्र, त्यांच्या सुगावा लागत नव्हता. शेवटी विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली. तेथून कानपूरला आणत असताना एका पोलीस वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या गोळीबारात दुबे ठार झाला. ही चकमक खोटी असल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप होत आहेत. या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडूनही होत आहे.