नवी दिल्ली - ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रा २३ जूनला होणार होती, या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय दिला आहे. सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - ओडिशा जगन्नाथ पुरी रथयात्रा
ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील वार्षिक रथयात्रा २३ जूनला होणार होती, या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
राज्यात रथयात्रेसंबंधी २० दिवस चालणारे सर्व उपक्रम तसेच उत्सव बंद करण्याचे आदेशही सरन्यायाधिशांनी दिले. आम्ही या रथयात्रेस स्थगिती दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करतील, असे सरन्यायाधिशांनी नमूद केले. यावेळी राज्यात 30 जूनपर्यंत सार्वजनिक मेळावे आयोजित करण्यास मनाई असणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाचा हवाला देण्यात आला. या रथयात्रेत जवळपास १० लाख लोक एकत्र येऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना एवढे लोक एकत्र आल्यास परिस्थिती हातातून निघून जाईल, त्यामुळे सध्या रथयात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
दरम्यान, पाच जुनला पहिल्यांदाच भगवान जगन्नाथ यांची वार्षिक स्नान पौर्णिमा भाविकांच्या अनुपस्थितीत करण्यात आली होती. फक्त पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला असल्याचे सांगितले गेले. मात्र, यावेळी मास्कचा वापर न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले गेले. या कार्यक्रमासाठी मर्यादित लोकांचीच आवश्यकता होती. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये यात अनेक लोक हजर असल्याचे दिसून आले. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन झाले असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावेळी अनेक सेवक देवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला फिरताना दिसले होते.