नवी दिल्ली - मुस्लीम महिलांसाठी मशिदीत जाणे, तेथे प्रार्थना करण्याचा अधिकार मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संमती दिली. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या पीठाने केंद्राला याविषयी नोटीस बजावली असून याविषयी प्रतिसाद देण्यास सांगितले आहे. पुण्यातील यास्मीज झुबेर अहमद पीरजादे आणि झुबेर अहमद पीरजादे या जोडप्याने ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी दिलेल्या सकारात्मक निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे. यानंतर या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने संमती दिली. या याचिकेत म्हटल्यानुसार, मुस्लीम धर्मात महिलांना मशिदीत जाण्यास विरोध होत आहे काय, याविषयी मशिदींमध्ये चौकशी करावी, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिली आहे.
न्यायालयाचे प्रश्न
न्यायालयाने ही याचिका टिकेल की नाही, याची पडताळणी करण्यासाठी काही प्रश्न विचारले. 'तुम्ही इतर व्यक्तीला तुम्हाला समानतेची वागणूक देण्याची मागणी करू शकता का? हे प्रत्येक व्यक्तीला लागू होते का? तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून समानतेची वागणूक मिळण्यासाठी आवाहन करू शकता का? परिस्थिती सामानतेचा अधिकार नाकारू शकत...नाकारत नाही, हे आपल्याला समजते. चर्च किंवा मशीद ही परिस्थिती आहे का? एखादी व्यक्ती तुम्हाला त्याच्या घरात प्रवेश देऊ इच्छित नाही. तर त्यासाठी तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता का?' असे प्रश्न न्यायालयाने विचारले.