नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांची फेरविचार याचिका (क्युरेटीव्ह पीटीशन) सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली आहे. मात्र, आरोपी अजूनही राष्ट्रपतींकडे रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज करू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय पीठाने याबाबत निर्णय दिला. न्यायमूर्ती एन. व्ही रामन्ना, अरूण मिश्रा, आर. एफ नरीमन, आर बानुमती आणि अशोक भूषण यांच्या पीठाने फेरविचार याचिका फेटाळली. या प्रकरणातील उर्वरित दोन दोषींनी फेरविचार याचिका दाखल केली नव्हती.
फाशीची शिक्षा झाल्यानंतर दोघांनी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. मात्र, फेरयाचिका फेटाळल्यामुळे चौघा दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २२ जानेवरीला चौघांना फाशी देण्यात येणार आहे.
निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनाने फाशीच्या शिक्षेची तयारी केली असून आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू केले आहे. तुरुंगामध्ये आरोपींच्या वजनाप्रमाणे पुतळ्यामध्ये रेती-दगड भरून एक डमी व्यक्ती तयार करण्यात येते. त्यानंतर डमी व्यक्तीला फाशी देण्यात येते. आरोपींना फाशी देताना वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनानं तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्याच्या शिक्षेचा अभ्यास केला जातो.
आरोपींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी देण्यात येणार आहे. मेरठ तुरुंगातील जल्लाद पवन हे दोषींना फासावर लटकवणार आहेत. चारही आरोपींना एकाचवेळी फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जल्लाद बोलावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काय आहे निर्भया प्रकरण? -
पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली 'निर्भया' आणि तिचा इंजिनिअर मित्र १६ डिसेंबर २०१२ ला रात्री दिल्लीतील एका मॉलमधून 'लाईफ ऑफ पाय' सिनेमा पाहून परतत होते. निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचे होते. दोघेही द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने हस्तक्षेप केला. मात्र, आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला.
यानंतर त्या सहा जणांनी बसमध्येच निर्भयावर बलात्कार केला. ते नराधम केवळ बलात्कार करून थांबले नाहीत, तर तिला अमानुष मारहाण केली आणि गंभीररीत्या जखमीही केले. नराधनांमी तिच्या शरीराचा अत्यंत छळ केला. शरीरावर अमाप जखमांनी मृत्यूशी झुंज देत निर्भया रक्ताने माखली होती. त्यानंतर तिच्या मित्राला आणि तिला दिल्लीतील वसंत विहारजवळ चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिले.
आरोपींनी दोघांना बसमधून बाहेर फेकले. त्यावेळी बसने चिरडून टाकण्याचाही प्रयत्नही केला. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या त्या दोघांनी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र, सुरुवातीला कोणीच थांबले नाही. त्यानंतर रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस ठाण्यात फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 10.55 वाजता निर्भया आणि तिच्या मित्राला सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केले गेले.