नवी दिल्ली :जेईई आणि नीट या पूर्वपरिक्षांना बसणाऱ्या १७ लाखांहून अधिक विद्यार्थांनी आपले हॉल-तिकीट डाऊनलोड केले आहे. म्हणजेच, विद्यार्थी आणि पालकांनाही परीक्षेला हजर रहायचे आहे. कोणत्याही परीस्थितीमध्ये परीक्षा व्हाव्यात ही त्यांची इच्छा आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द व्हाव्यात अशी मागणी देशभरातून केली जात आहे. याबाबत बोलताना पोखरियाल यांनी ही माहिती दिली. जेईई-मेन्स (JEE-Mains) परीक्षेला बसणाऱ्या सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी, तर नीट (NEET) परीक्षेला बसणाऱ्या १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले हॉल-तिकीट डाऊनलोड केले आहेत. तसेच, आम्हाला परीक्षा घेण्यास पाठिंबा दर्शवणारे कित्येक विद्यार्थी आणि पालकांचे ईमेल मिळाले आहेत. कितीतरी विद्यार्थी गेल्या दोन-तीन वर्षांपासून या परीक्षांची तयारी करत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले.