मुंबई -दिल्लीतील 'निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी' दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले. न्यायालयाने मंगळवारी (7 जाने.) दिलेल्या निर्णयानुसार २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाईल. आज सात वर्षांनंतर निर्भया प्रकरणाचा निकाल आला आहे. 16 डिसेंबर 2012ला घडलेल्या त्या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजडला. त्यामुळे संपूर्ण देशाला हादवणारे हे निर्भया बलात्कार प्रकरण नेमके काय होते, याची ही संक्षिप्त माहिती...
हेही वाचा... BREAKING... निर्भयाला ७ वर्षानंतर न्याय ! दोषींना फाशीची तारीख ठरली
डिसेंबर 16.... रात्री 9 वाजता... ठिकाण दिल्ली...
16 डिसेंबर 2012 च्या रात्री 9 वाजता दिल्लीतल्या मुनारिकाजवळ चालत्या बसमध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची क्रूर घटना घडली. या घटनेचे दिल्ली, भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले. यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित तरूणीलाच पुढे 'निर्भया' असे नाव देण्यात आले.
नेमकं काय घडले ?
पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली 'निर्भया' आणि तिचा इंजिनिअर मित्र दिल्लीतील एका मॉलमधून 'लाईफ ऑफ पाय' सिनेमा पाहून परतत होते. निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचे होते. दोघेही द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करयाला सुरूवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने हस्तक्षेप केला. मात्र, आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला.
यानंतर त्या सहा जणांनी बसमध्येच निर्भयावर बलात्कार केला. ते नराधम केवळ बलात्कार करून थांबले नाहीत, तर तिला अमानुष मारहाण केली आणि गंभीररीत्या जखमीही केले. नराधनांमी तिच्या शरीराचा आत्यंतिक छळ केला. त्यातील एकाने गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगात घुसवली. या कृत्यामुळे निर्भयाच्या शरीरातील आतडी बाहेर आली. शरीरावर अमाप जखमांनी मृत्यूशी झुंज देत निर्भया रक्ताने माखली होती. त्यानंतर आरोपींनी निर्भयासह तिच्या मित्राला नग्न केले आणि दिल्लीतील वसंत विहारजवळ चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिले.
आरोपींनी दोघांना बसमधून बाहेर फेकले, त्यावेळी बसने चिरडून टाकण्याचाही प्रयत्नही केला. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या त्या दोघांनी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र सुरूवातीला कोणीच थांबले नाही. त्यानंतर रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 10.55 वाजता निर्भया आणि तिच्या मित्राला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
देशभरात संतापाची लाट... लोकांची सरकारकडे न्यायाची मागणी...
दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देशातील तळागाळातील लोकांपर्यंत ही घटना पोहोचली. यानंतर लोक रस्त्यावर उतरले. निर्भयासोबत झालेल्या घटनेने प्रत्येक देशवासीयाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आरोपींना अटक करण्याची मागणी तीव्र होऊ लागली. 18 डिसेंबरला देशाच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. निर्भयाच्या बलात्काऱ्यांना मृत्यूदंड देण्याची खासदारांनी मागणी केली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तसे आश्वासन दिले.
पोलिसांनी अखेर नराधमांच्या मुसक्या आवळल्या...
निर्भयाच्या गुन्हेगारांना पकडण्याची मागणी जोर धरत होती आणि देशभरातील आवाज वाढत होता. देशभर ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे होत होते. परिणामी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत गेला. त्यानंतर आठवड्याभरातच दिल्ली पोलिसांनी या कृत्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 17 डिसेंबर रोजी मुख्य आरोपी असलेला बसचा चालक राम सिंहसह तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर 21-22 डिसेंबरला इतर तीन आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये चालकाचा भाऊ मुकेश सिंह, जिम इंस्ट्रक्टर विनय शर्मा, फळ विक्रेता पवन गुप्ता, बस हेल्पर अक्षय कुमार सिंह आणि एक अल्पवयीन (वय 17 वर्षे) या आरोपींचा समावेश होता.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवले होते.
निर्भयाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी...
त्या दिवसांपासूनच निर्भया मृत्यूशी झुंज देत होती. तिची स्थिती अतिशय नाजूक होत चालली होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. निर्भयाची प्रकृती आणखी खालावत असल्याने, अखेर तिला सिंगापूरमधील माऊंट एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिंगापूरमध्येच उपचारादरम्यान २९ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. त्याच दिवशी निर्भयाचा मृतदेह भारतात आणण्यात आला. निर्भयाच्या मृत्यूनंतर देशभरातील लोकांचा संताप आणखी वाढला. आंदोलनांने आक्रमक रूप धारण केले. आरोपींच्या शिक्षेसाठीची मागणी तीव्र झाली. आज सात वर्षांनंतर त्या नराधमांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. येत्या 22 जानेवारीला या शिक्षेची अंमलबजावणी होईल.