रांची (झारखंड) - मनात जिद्द असेल तर एव्हरेस्टही पार होतो. मेलेल्या मनाला साधा जीना चढता येत नाही. जिंकण्याची इच्छा मनात बाळगली आणि जिद्दीने कामाला लागले की प्रत्येक कठीण गोष्ट सोपी होते. रांचीच्या लक्ष्मी शर्मा यांनी नॅशनल गेम्समध्ये सलग चार वर्षे सुवर्ण पदक जिंकून हे सिद्ध करून दाखवल आहे.
जिद्दीच्या जोरावर लक्ष्मी ठरली 'नॅशनल चॅम्पियन' वयाच्या 36 व्या वर्षी सामान्य महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र असतात. मात्र, या वयातही लक्ष्मी यांनी काही नवीन करण्याचे ठरवले. चार वर्षांपूर्वी त्यांना सायटिका या आजाराने ग्रासले होते. यानंतर त्यांच्या आयुष्याने नवे वळण घेतले. मुलाचा सल्ला आणि झारखंडच्या स्टार पॉवर लिफ्टर सुजाता भगत यांच्या सहकार्याने लक्ष्मीच्या जिद्दीला नवे पंख लागले.
लक्ष्मी यांना एका सर्वसामान्य मारवाडी परिवारातून अलेल्या लक्ष्मीसमोर अनेक आव्हाने होती. सुनेने अशा प्रकारे पॉवर लिफ्टिंग करणे घरच्यांना मान्य नव्हते. विरोध होत असतानाही केवळ मुलांच्या पाठिंब्याने त्यांनी एका स्थानिक स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत त्या विजयी देखील झाल्या. यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 2017 मध्ये झारखंडच्या नॅशनल गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवत त्यांनी विरोधकांना चांगलीच चपराक लगावली. 2017 नंतर लक्ष्मीने सलग चार सुवर्णपदके मिळवून नॅशनल चॅम्पियनशिपही जिंकली.
जग चंद्रावर का जाईना पण समाज पुरुष आणि महिलेतील भेदभाव करतच राहणार, असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अनुभव त्यांनी संघर्षाच्या काळात घेतल्याचेही त्या म्हणाल्या.