नवी दिल्ली -इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. गरिबांच्या दु:खातून नफा कमवायचे थांबवा, असा खोचक टोला पंतप्रधानांना मारला आहे. कोरोना संकट काळात गरीब आणि मध्यम वर्गाच्या हातात थेट पैसे देण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान मोदी, या कठीण काळात गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या थेट हातात पैसे देण्याचे आदेश द्या. त्यांच्या यातनेतून नफा कमवायचे थांबवा. '#मोदी स्टॉप लुटींग इंडिया' असा हॅश टॅग तयार करत त्यांनी मोदींवर ट्विटरवरून टीका केली.
इंधनाचे दर कमी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे, हे पत्रही राहुल गांधी यांनी ट्विटरवरून शेअर केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना पैसे द्यावे लागतात आणि भांडवलदारांना ते मिळतात, असे राहुल गांधी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि गरीबांचे या कठीण काळात कंबरडे मोडले आहे, त्यामुळे दरवाढ मागे घ्यावी, असे काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनीही म्हटले आहे.
पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांनी सलग दहाव्या दिवशी इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत 76.26 रुपये प्रति लिटर पेट्रोल आता 76.73 झाले आहे. तर डिझेल 74.26 वरून 75.19 वर गेले आहे. सलग दहा वेळा दरवाढ केल्याने पेट्रोलच्या किमती 5.47 तर डिजेलच्या किमती 5.8 रुपयाने वाढल्या आहेत.