श्रीनगर- संपूर्ण देशात ईद उत्साहात साजरी केली जात असताना जम्मू काश्मीरमध्ये मात्र वातवारण चिघळले आहे. श्रीनगरच्या जामीया मशिदीजवळ फुटीरतावाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. यावेळी त्यांनी कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे पोस्टरही झळकावले.
काश्मीर पेटले... मसूद अझहरचे पोस्टर झळकावत फुटिरतावद्यांची सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक - eid
काही दिवसांपूर्वी जाकीर मुसा या दहशतवाद्याचा लष्कराने खात्मा केला होता. त्याच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात त्याच्या समर्थकांनी रोष व्यक्त केला होता. तेव्हापासून लष्करावरील हल्ले वाढले आहेत.
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील जामीया मशिदीजवळील लष्करी तळावर जमावाने अचानक दगडफेक करण्यास सुरूवात केली. या जमावातील आंदोलकांनी कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे पोस्टर झळकावत "काश्मीर बनेगा पाकिस्तान" अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी स्वत:ला 'मुसा आर्मी' असे संबोधले असून जाकीर मुसा हा अल-कायदाची सहयोगी संघटना अंसार-घजवत-उल-हिंदचा म्होरक्या होता. त्याचा काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने खात्मा केला होता. त्याच्या अंत्ययात्रेतही मोठ्या प्रमाणात स्थानिक सहभागी झाले होते.
सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काबूत येत नसल्याने जवानांनी पॅलेटगनच्या सहाय्याने गोळीबार केला. सध्या शहरातील परिस्थिती तणावग्रस्त असून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.