नवी दिल्ली - जगातला सर्वात भव्य पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गॅलरीला पहिल्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात गळती लागली आहे. या गॅलरीत पावसाच्या पाण्याचं तळं झालं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पुतळा तयार करण्यासाठी तब्बल २ हजार ९८९ कोटींचा खर्च आला आहे. पुतळ्याच्या गॅलरीत गळती लागल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरातमध्ये नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. या पुतळ्याचा देखभाल करण्यासाठी दिवसाला १२ लाख रुपयांचा खर्च येतो. याचे ताजमहालच्या प्रवेश शुल्काहून सातपट अधिक महाग प्रवेश शुल्क आहे. असे असूनही याच्या बांधकामात काही उणिवा राहिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुतळ्याच्या गॅलरीच्या छतामधून पाण्याची गळती होत आहे.