जयपूर - राजस्थानात उद्या(शुक्रवारी) राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहेत. आमदारांची पळवापळवी होवू नये म्हणून काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपने आपआपल्या आमदारांना विविध हॉटेलात ठेवले आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 9 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर 5 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतदानासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईझेशनही करण्यात आले असून सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येणार आहे. 'राज्य सभा निवडणुकीसाठी सर्वकाही तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. कोरोनामुळे विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्वकाही सुरक्षेचे नियम पाळण्यात येणार आहेत, असे निवडणूक अधिकारी प्रमिल कुमार माथूर यांनी सांगितले.