नवी दिल्ली -श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाया राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला परदेश दौरा आहे. यादम्यान, त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर गोताबाया यांनी झालेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली.
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या हिंदी महारसागराच्या पट्ट्यात श्रीलंकन आणि भारतीय मच्छिमार बोटी मासेमारी करत असतात. अनेकदा भरकटल्यामुळे या बोटी एकमेकांच्या हद्दीत प्रवेश करतात. किनाऱ्याजवळील तसेच, श्रीलंकेच्या हद्दीतील समुद्रात मासेमारी करण्याविषयी श्रीलंकन सरकारचे नियम कडक आहेत. यामुळे अनेक भारतीय मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह अटक केली जाते. या मुद्द्यावर मोदी आणि राजपक्षे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यानंतर राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली.
हेही वाचा - गांधीजींचा मारेकरी गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून साध्वींवर खटला दाखल
भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करत असून दहशतवादाविरोधातील ही लढाई सुरूच राहील, असे पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले. तसेच, या भारत श्रीलंकेला साथ देईल, असे ते म्हणाले. यावर राजपक्षे यांनीही दहशतवादाविरोधातील लढाईत भारत आमच्यासोबत असून आम्हीही सर्व मुद्द्यांमध्ये भारतासोबत आहोत, असे सांगितले. श्रीलंकेत ईस्टरच्या रविवारी ख्रिस्ती प्रार्थनास्थळे आणि काही हॉटेलांवर बॉम्बहल्ला झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या मुद्द्यावर राजपक्षे सत्तेत आले.
दरम्यान, भारत दौऱ्याच्या काही दिवस आधी श्रीलंकन न्यायालयाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हटवले. त्यांच्यावर येथील उच्च न्यायालयात १ लाख ८५ हजार अमेरिकन डॉलर्सच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. तसेच, राजपक्षे यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. श्रीलंकन संविधानातील तरतुदींनुसार राष्ट्राध्यक्षांविरोधात नागरी किंवा गुन्हेगारी खटले चालवता येत नाहीत. यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले. तसेच, त्यांच्यावरील बंदी हटवून त्यांना पासपोर्टही परत करण्यात आला. बंदी हटविण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून ते पहिल्याच परदेशी दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.
हेही वाचा - ..तर प्रज्ञा ठाकूरला जिवंत जाळू; काँग्रेस नेत्याची धमकी!