नवी दिल्ली - श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या प्रकरणी २४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २०७ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ४५० जण जखमी झाले. यातील १७ परदेशी नागरिकांची ओळख पटविण्यात यश आले आहे. यात ३ भारतीयांचा समावेश आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यानंतर कोणत्याही प्रकारच्या मानवीय सहाय्याची तयारी भारताने दर्शवली आहे.
रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले. बचावकार्यास सुरुवात झाल्यानंतर जखमींना कोलम्बो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी आज सकाळी ६ वाजता उठवण्यात आली आहे.