हैदराबाद :कोरोना महामारी पसरल्यापासून जगभरातील लोकांना एकच प्रश्न पडला आहे, की या आजारावर लस कधी येणार? जगभरातील विविध वैद्यकीय संस्था आणि औषधनिर्माण कंपन्या लवकरात लवकर कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी बऱ्याच कंपन्यांना यामध्ये काही प्रमाणात यशही मिळताना दिसून येत आहे. सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुटनिक-५ अशा विविध लसी चाचण्यांच्या विविध टप्प्यांमध्ये असल्याच्या बातम्या आपण वाचत आहोत. चांगली गोष्ट म्हणजे, दिवसेंदिवस या लसी अधिक परिणामकारक ठरत असल्याबाबत बातम्या समोर येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगभरात १५०हून अधिक कोरोना लसींवर संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. यामधील ४४ लसी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत, तर ११ लसींची मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्येच फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी आपापल्या कोरोना लसी या ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. यासोबतच, रशियाच्या स्पुटनिक-५ लसीनेही तिसऱ्या टप्प्यामध्ये ९२ टक्के परिणामकारकता दाखवल्याचा दावा रशियाने केला आहे. या बातम्या अर्थातच चांगल्या, आणि आशादायक आहेत.
मॉडर्ना..
अमेरिकेतील औषधनिर्माण कंपनी मॉडर्नाने आपली कोरोना लस ९४.५ टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यामधील अहवालानुसार मॉडर्नाने हा दावा केला आहे. या लसीची सध्या ३० हजार स्वयंसेवकावर चाचणी सुरू आहे. या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. मात्र, काहींना अंगदुखी आणि लसीचे इंजेक्शन दिलेल्या जागेवर दुखणे अशा प्रकारचे दुष्परिणाम आढळून आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
फायझर आणि मॉडर्नाने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी एकाच वेळी सुरू केली होती. मात्र, फायझरचा अहवाल लवकर आणि मॉडर्नाचा उशिरा प्राप्त झाला. लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस यामध्ये तीन आठवड्यांचा कालावधी असायला हवा असा नियम आहे. मात्र, मॉडर्नाने अधिक खबरदारी बाळगत चार आठवड्यांनंतर दुसरा डोस दिल्यामुळे हा उशीर झाला.
मॉडर्ना सध्या आपल्या लसीचा वापर गंभीर रुग्णांवर करण्यासाठीची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, या वर्षाअखेर आपल्या लसीचे २० दशलक्ष डोस तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे.
फायझर..
कोरोना लस बनवण्याच्या शर्यतीत सध्या फायझर आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात घेतलेल्या चाचणीचा प्रिलिमिनरी डेटा जाहीर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. आपली कोरोना लस ही ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा या कंपनीने केला असला, तरी डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार ही लस घेतलेल्या स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणात हँगओव्हर, ताप आणि अंगदुखी असे दुष्परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे, दुसऱ्या डोसनंतर हे दुष्परिणाम अधिकच जाणवल्याचे एका स्वयंसेविकेने सांगितले.
मात्र, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला प्लासेबो देण्यात आला आहे, की लसीचा डोस देण्यात आला आहे, याबाबत या स्वयंसेवकांना माहिती नव्हती. त्यामुळे दुष्परिणाम आढळलेले लोक प्लासेबो दिलेल्या गटातीलही असू शकतात.
मॉडर्नाप्रमाणेच फायझरही आपल्या लसीचा वापर गंभीर रुग्णांवर करण्यासाठीची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत ते डिसेंबरमध्ये अमेरिका सरकारकडे निवेदन करतील. यासाठी कंपनीला ४४ हजार स्वयंसेवकांवरील दोन महिन्यांच्या चाचण्यांचा अहवाल सरकारकडे सादर करावा लागणार आहे, जो या महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे.
स्पुटनिक-५